पावसाळ्याचा विचार मनात आल्याबरोबर एक विशेष प्रकारचे वातावरण डोळ्यांसमोर येते. या वातावरणाने पावसाळा सुरू झाल्याची जाणीव होते. असा हा वातावरणाचा फरक होण्याचे कारण पृथ्वी व सूर्य यांची गती. पृथ्वी व सूर्य यांच्या गतीमुळे वातावरणात जे बदल होतात त्यांचा मनुष्यशरीरावर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या दृष्टीने आयुर्वेद शास्त्रज्ञांनी संबंध वर्षाचे दोन भागामध्ये वर्णन केले आहे. आपला देश पृथ्वीच्या उत्तरार्धात येतो. म्हणून सूर्य ज्या वेळी पृथ्वीच्या उत्तरार्धाजवळ येतो, त्या वेळी आपल्याकडे उन्हाळा अधिक असतो. या काळाला ‘ उत्तरायण ‘ म्हणतात. त्याचप्रमाणे सूर्य ज्या वेळी पृथीच्या दक्षिणार्धात अधिक जातो त्या काळाला ‘ दक्षिणायन ‘ म्हणतात. या काळात सूर्य आपल्या देशापासून दूर गेल्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन थंडीचे दिवस येतात. पावसाळा हा उन्हाळ्यात अगर हिवाळ्यात येतो. महाराष्ट्रातील पावसाळा हा उन्हाळी आहे.
पावसाळ्यात आहार कसा असावा?
अत्यंत उष्णतेमुळे उन्हाळ्यात शरीरातील सौम्य भाव कमी होतात. शरीर रूक्ष होते व दुर्बल होते. थकवा येतो, काम करण्याची स्फूर्ती राहत नाही. उष्णता अधिक असते म्हणून तहान फार लागते, त्यामुळे द्रवपदार्थ पोटात फार घेतले जातात. त्यामुळे अग्नि मंद होतो. अशा वातावरणातच पावसाची सुरुवात होते. साहजिकच अग्नि आणखी मंद होतो. म्हणूनच पावसाच्या सुरुवातीलाच हलके अन खावे. गहू तांदूळ शक्यतो जुने वापरावे. नवीन धान्य वापरायचे झाल्यास प्रथम भाजून नंतर उपयोगात आणावे. धान्य भाजल्यामुळे पचायला हलके होतात. पोळी, भाकरी तव्यावर भाजण्यापेक्षा विस्तवावर शेकवावी. मूग, मसूर, चणे इत्यादी कडधान्यांचे सूप करून उपयोग करावा. थोडे कडधान्य घेऊन त्यात भरपूर पाणी घालून शिजवावे. खाण्याकरिता फक्त वरचे पाणीच काढून घ्यावे. त्यात हिंग, जिरे, मीठ, लसूण असे पदार्थ घालावे. मासांहारी लोकांनीसुद्धा मटणाच्या ऐवजी मटण सूप घ्यावे. पाणी उकळून घ्यावे. कडधान्यांच्या उसळी, मटण, जड मक्याने खाऊ नयेत. विशेष कारण नसेल तर पावसात भिजू नये. आहारात सुंठ, आले, हिंग, सैधव वापरावे.
अजीर्ण
पावसाळ्यातील दुसरा आढळणारा विकार म्हणजे अजीर्ण. अग्नि मंद झालेला असतो त्यामुळे खाल्लेले अन पचत नाही. काही जणांना जुलाब होतात, काहींचे पोट दुखते. काहींना गॅस होतो व पोटाची बेचैनी वाढते. अशा वेळी प्रथम सर्व घन आहार बंद करावा. शक्य तर लंघन करावे. चहा, कॉफी अशी पेये घ्यावी. तांदळाची पेज, मऊ भात खावा. नंतर हळूहळू अन्न सुरू करावे. सुंठीचे चूर्ण अर्धा चमचा एकावेळी दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे. अजीर्णामुळे फक्त पोट दुखत असल्यास ‘ शंखवटी ‘ दोन गोळ्या प्रत्येक वेळी याप्रमाणे दिवसातून तीन वेळा घ्याव्या.
सर्दी
याचबरोबर पावसाळ्यात आढळणारा विकार म्हणजे सर्दी. डोके दुखणे किंवा जड होणे, नाकातून पाणी येणे व सारख्या शिंका येणे अशी लक्षणे सुरू होतात. तर अशा वेळी लगेच ‘ त्रिभुवनकीर्ति रस ‘ दोन दोन गोळ्या दिवसातून चार वेळा गरम पाण्याबरोबर घ्याव्या. संध्याकाळचे जेवण अगदी हलके असावे. रात्री झोपताना गवती चहा, तुळशीची पाने, काळी मिरी, पुदिना, आले यांचा काढा करून थोडा गूळ घालून गरम गरम घ्यावा. थंड पदार्थ वर्ज्य करावे. गवती चहा तयार करताना त्याच्या वाफेचा शेक घ्यावा. अशा प्रकारे उपचार केल्याने सर्दी हा विकार दोन-चार दिवसांत बरा होतो. सर्दीचा योग्य उपचार न झाल्याने अथवा सर्दीशिवायही पावसाळ्यात खोकला हा विकार होतो. सुका व ओला असा दोन प्रकारचा खोकला असतो. सुक्या खोकल्याकरिता ज्येष्ठमधाचा गरम गरम काढा दिवसातून तीन-चार वेळा घ्यावा. ज्येष्ठमधाचे लहान लहान तुकडे तोंडात धरून चघळावे. ओल्या खोकल्याकरिता सुंठीचा काढा किंवा त्रिभुवनकीर्तिचा मधातून उपयोग करावा. सितोपलादि चूर्ण चहाचा अर्धा चमचा दिवसातून तीन-चार वेळा मधातून घ्यावे. लवंगादिवटी खडीसाखरेबरोबर तोंडात धरून चघळावी. असे सामान्य उपचार करून खोकला बरा न झाल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा.
सर्दी खोकला यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे दमा होण्याची शक्यता असते. तसेच बहुतेक दम्याच्या रोग्यांना पावसाळ्यात हटकून त्रास होतो. दमा हा कष्टप्रद विकार असल्यामुळे तज्ज्ञ चिकित्सकांकडून सल्ला घ्यावा.
आमवात व संधिवात
पावसाळ्यात आणखी दिसणारे रोग म्हणजे आमवात व संधिवात. आमवात हा लवकर उत्पन्न होणारा रोग आहे, तर संधिवात हा जुनाट रोग आहे. आमवातामध्ये रोग्याला ताप येतो, सांधे सुजतात व खूप दुखतात. अशा वेळी रोग्याने संपूर्ण लंघन करावे. आल्याचा चहा, उकळविलेले पाणी घ्यावे. वाळूच्या पिशवीने सांधे शेकवावे. योगराज गुग्गुळ, रास्नादि काढा ही औषधे घ्यावी. अशा प्रकारे पावसाळ्यातील विकारांची चिकित्सा करावी.