डोक्याला ताप(मायग्रेन)
आधुनिकीकरणामुळे सध्याचे जग हे गतिशील झाले आहे. ‘पळाल तर फळाल!’ हा आपल्या जीवनशैलीचा मूलमंत्र झाला आहे. कशासाठी पोटासाठी? म्हणून नोकरी, व्यवसायासाठी दिवसभर आटापिटा करणारे आपण खरोखरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो का, हा आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. या धावपळीच्या वेळापत्रकात आपण आपल्या स्वास्थ्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने अनेक विकतची दुखणी ओढावून घेतली आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘मायग्रेन’ (अर्धशिशी).
लक्षणे :
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार मायग्रेन या व्याधीत प्रत्यक्ष वेग (attack) येण्यापूर्वी काही वेळा दोन-तीन दिवस अगोदर मलविबंध, मनाची अस्वस्थता किंवा बेचैनी, वारंवार घशाला शोष पडणे इ. लक्षणे दिसून येतात. तसेच मायग्रेनचा अॅटॅक येण्याआधी डोळ्यांपुढे प्रकाश चमकणे, बोलताना त्रास होणे इ. लक्षणे जाणवतात. प्रत्यक्ष वेग आल्यावर डोक्याच्या विशिष्ट भागात तीव्र वेदना, मळमळणे, उलटी किंवा उलटीची संवेदना, प्रकाश किंवा आवाज सहन न होणे ही लक्षणे दिसून येतात / हे त्रास होतात. ही वेगावस्था काही तास ते काही दिवसही राहू शकते.
आयुर्वेदशास्त्राने वातज, पित्तज, कफज इ. अकरा प्रकारचे शिरोरोग सांगितले आहेत. त्यापैकी ‘अर्धाव-भेदक’ या आयुर्वेदोक्त शिरोरोगाचे मायग्रेन (अर्धशिशी) विकाराशी साधर्म्य दिसून येते.
कारणे :
आयुर्वेदानुसार कारणांचा विचार करता अति प्रमाणात आहार सेवन, मका-चणे-कडधान्ये यासारख्या रुक्षता वाढविणाऱ्या पदार्थांचे वरचेवर व अति प्रमाणात सेवन, चिवडा /फरसाण / वेफर्स / शेंगदाणे यासारखे पदार्थ वरचेवर सेवन करण्याची सवय, अति शारीरिक दगदग, मल-मूत्र-भूक-तहान, निद्रा यांसारख्या नैसर्गिक संवेदना सतत दाबून ठेवण्याची सवय, अति मैथुन, संताप, मनस्ताप, मानसिक ताण-तणाव इ. कारणे शरीरातील वातदोषाला प्रकुपित करतात.हा प्रकुपित वात दोष स्वतंत्रपणे किंवा कफदोषासहित शिरःप्रदेशी विशिष्ट अर्ध्या भागात शस्त्राने कापल्याप्रमाणे किंवा घुसळल्याप्रमाणे अत्याधिक प्रमाणात तीव्र स्वरूपाच्या वेदना निर्माण करतो. या वेदना डोक्याच्या अर्ध्या भागात होत असल्याने आयुर्वेदाने याला ‘अर्धावभेदक’ असे म्हटले आहे. या डोकेदुखीत वातदोषाचे प्राधान्य दिसून येते. प्रकुपित वाताबरोबर पित्ताचा अनुबंध असेल, तर दुपारी व कफाचा अनुबंध असेल तर ही डोकेदुखी विशेषतः सकाळी सुरू होते.
उपचार :
आयुर्वेदशास्त्रानुसार चिकित्सेचा विचार करता ‘निदान परिवर्जन’ म्हणजेच व्याधीला कारणीभूत ठरणाऱ्या कारणांचा त्याग, ही चिकित्सेची पहिली पायरी असते. म्हणून जेवणाच्या वेळेत नियमितता ठेवावी. सकाळी ८ ते ९ दरम्यान नाश्ता, दुपारी १२ ते १ दरम्यान दुपारचे जेवण, संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान हलके खाणे व रात्री ८.३० ते ९.०० दरम्यान रात्रीचे जेवण असे आहार सेवनाचे वेळापत्रक उपयुक्त ठरते. तुम्ही जो आहार घेता, तो पचण्यास हलका व पोषक असावा. जुन्या तांदळाचा भात, मुगाची खिचडी, तांदळाची भाकरी / ज्वारी किंवा तांदूळ - ज्वारीभाकरी / फुलका, मुगाचे वरण, दुधी-कोबी-पडवळ, भेंडी यासारख्या पथ्यकर फळभाज्या, मूग-मसुरासारखी पचण्यास हलकी कडधान्ये, लाल माठ-पालक-तांदुळजा या पालेभाज्या, मसाल्यात हिरवी मिरची, गरम मसाल्याऐवजी धणे-जिरे पावडर, हिंग, ओवा, पुदिना, कोथिंबीर यांचा वापर करावा. फोडणीसाठी शक्यतो तेलाऐवजी गाईच्या साजूक तुपाचा वापर करावा. अति प्रमाणात भोजन, उपवास, वरचेवर खाणे टाळावे. पावभाजी - वडापाव - मिसळ यासारखे जळजळीत पदार्थ, हिरवी मिरची – ठेचा यांसारखे तीक्ष्ण पदार्थ, भजी-पुरी-समोसा-वडे यासारखे तळलेले पदार्थ वरचेवर व अति प्रमाणात खाणे टाळावे. या विकारातील वातदोषाचे प्राधान्य लक्षात घेता सोयाबीन, छोले, राजमा, चणाडाळ, बेसनपीठ यांसारखे वातूळ पदार्थ वर्ज्य करावेत.
हे लक्षात ठेवा :
कामाच्या धावपळीत मल-मूत्र-भूक इ. नैसर्गिक संवेदना दाबून ठेवल्यास कालांतराने त्याची शरीराला सवय होते. त्यामुळे या नैसर्गिक संवेदना निर्माण झाल्यावर त्या दाबून ठेवू नयेत व संवेदना निर्माण झाल्या नसताना त्यांचे बळजबरीने उत्सर्जन करणे टाळावे. मोबाइल-लॅपटॉप-कॉम्प्युटर यांच्या अतिरेकी वापराने होणारे रात्रीचे जागरण टाळावे. संताप, चिडचिड, काळजी करण्याचा स्वभाव मनावरचा ताण वाढवितात व परिणामी डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे मन आनंदी व प्रसन्न ठेवावे. आपल्या आवडीच्या छंदाची जाणीवपूर्वक जोपासना करावी.रोज सकाळी लवकर उठून अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जावे. योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, योगासने करावीत.
आयुर्वेदिक उपचार :
मायग्रेन या विकारात वमन, विरेचन, बस्ति, नस्य इ. पंचकर्मे तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. मायग्रेन या विकाराच्या वेगावस्थेत सुवर्ण सुतशेखर, लघु सुतशेखरसारखे औषधी कल्प उपयुक्त ठरतात. आहारात मोरावळ्या-सारख्या पित्तशामक पदार्थांचा समावेश करावा. सुंठ पावडर १ चमचा व खडीसाखरेचे चूर्ण ४ चमचे असे मिश्रण करून रोज सकाळ - संध्याकाळ हे मिश्रण लहान पाव चमचा घ्यावे.
‘सर सलामत तो पगडी पचास!’ हे लक्षात ठेवून आपण सुयोग्य आहार, विहार व वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यास या मायग्रेन विकारावर मात करू शकू, हे निश्चित!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. एस. पी. सरदेशमुख