स्त्रियांच्या आयुष्यातील बराचसा काळ हा प्रजननाशी निगडित असतो. मासिकपाळी सुरू झाल्यापासून ते मासिकपाळी बंद होईपर्यंत (म्हणजेच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीपर्यंत) साधारण ३० वर्षांचा काळ असतो. ( वय १५ ते ४५ वर्षे.)
तरुण वयात स्त्रियांना होणारे आजार साधारणत : प्रसूती संबंधित असतात. कमी वयात गरोदर राहणे, वारंवार गरोदर राहणे व प्रसूत होणे, वारंवार गर्भपात होणे किंवा करणे ह्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी त्यांनी योग्य ती गर्भनिरोधक साधने वापरली पाहिजते. कन्डोम्स, गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर टी (लूप) याबद्दल डॉक्टरांकडून व्यवस्थित सल्ला घेऊन त्याचा वापर केला पाहिजे. लग्नाआधीच विवाहपूर्व समुपदेशन (प्री–मॅरिटलकौन्सिलिंग) करणे गरजेचे आहे.
काही आजार जे लैंगिक संक्रमणातून होतात. उदा. एच. आयव्ही., हिपॅटायटिस बी. त्यांची तपासणी दोन्ही जोडीदारांची करणे आवश्यक आहे, त्यामुळे एचआयव्हीसारख्या आजाराचा संसर्ग एकमेकांना होणे टाळता येते. हिपॅटायटिस बी साठी लस घेऊन जोडीदाराचे संसर्गापासून रक्षण करता येते. तसेच बीटा थॅलासेमिया ह्या आजाराची तपासणी केल्याने दोन थॅलासेमिया मायनर आजार असलेल्या व्यक्तींचे लग्न होणे टाळता येते. अशा व्यक्तींचे लग्न झाल्यावर त्यांच्या मुलांमध्ये थॅलासेमिया मेजर हा आजार होऊ शकतो. ज्यात मुलांना वारंवार रक्त देण्याची गरज पडते.
गरोदरपणात घेण्याची काळजी :
- वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणी करणे.
- समतोल आहार घेणे.
- नियमितपणे लोह व कॅल्शियमच्या गोळ्या घेणे.
- प्रसूतीशी निगडित असलेल्या आजारांवर लक्ष ठेवणे.
उदा. अर्निमिया, रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड (सुरुवातीचे ६ महिने, दर महिन्याला नियमित तपासण्या, ७व्या व ८व्या महिन्यात दर १५ दिवसांनी आणि ९व्या महिन्यात दर आठवड्याला करणे आवश्यक आहे.)
प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये नोंदणीही करणे गरजेचे आहे. शहरात साधारणपणे हॉस्पिटलमध्येच प्रसूती होते पण खेड्यांमध्ये अजूनही काही ठिकाणी बायका घरीच बाळंत होतात.
गरोदरपणात आढळणारे आजार –
(१) अॅनिमिया – (रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे)
हा खूप प्रमाणात किंवा नेहमी आढळणारा आजार आहे आणि मातामृत्यूच्या कारणांमधील एक महत्त्वाचे कारण आहे.
प्रतिबंध
१) योग्य आहार घेणे.
२) लोह असलेले पदार्थ उदा. हिरव्या पालेभाज्या, बीट, खजूर, अंजीर, चणे इत्यादी नियमितपणे खाणे.
३) लोह खनिजाच्या गोळ्या घेणे.
(२) रक्तदाब वाढणे – हा आजार पण खूप प्रमाणात आढळतो आणि त्यामुळेही मातामृत्यूच्या दरात वाढ होते. नियमित प्रसूतीपूर्व तपासणी केल्याने लवकर निदान करून रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. अतिरक्तदाब वाढला तर फिट येणे, मेंदूत रक्तस्त्राव होणे यासारखी गुंतागुंत होण्याची शक्यता असते. अतिरक्तदाब वाढण्याआधी प्रसूती केल्याने अशी गुंतागुंत टाळता येते.
(३) गरोदरपणातील मधुमेह – गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रसूतीपूर्व तपासण्यांमध्ये मधुमेहासाठी खास रक्ततपासणी दोन ते तीन वेळा करणे गरजेचे असते. अनियंत्रित मधुमेह हा आई आणि बाळ या दोघांसाठीही हानीकारक असून आईच्या जीवालाही धोका उद्भवू शकतो. बाळाला व्यंग असणे, अति वजन होणे किंवा कमी वजन होणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अति कमी होणे असे त्रास होऊ शकतात.
(४) हायपोथायरॉडिझम – आईच्या शरीरातील थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण जरी थोड्या प्रमाणातही कमी असले तरी बाळाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. रक्तदाब वाढणे, वेळेआधी प्रसूती होणे वगैरे गुंतागुंतीही थायरॉईडच्या आजारामुळे होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी रक्ततपासणी करणे आवश्यक.
चाळिशीच्या आसपास स्त्रियांचे आजार : –
( १) रक्तदाब व हृदयविकार – भारतीय स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण २० – २५ टक्क्यांनी वाढत आहे. याचा प्रतिबंध म्हणून जीवनशैलीत बदल, रक्तदाबाचे नियंत्रण, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी व रक्त पातळ ठेवण्यासाठी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.
( २) मधुमेह – सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण असण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये मधुमेहाचे प्रमाण साधारण १२ टक्के आहे.
स्क्रीनिंग – योग्य वजनाच्या स्त्रिया–४५ वर्षांपासून सुरू करावे.
स्त्रिया – जास्त जोखीम असलेल्या – (लठ्ठपणा, कुटुंबातील व्यक्तींना मधुमेह असणे, रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, पीसी. ओएस,) ३० वर्षांपासून.
प्रतिबंध – जन्माआधी गर्भवती मातेला योग्य ते पोषण देणे व बाळाचे वजन कमी न होऊ देणे. व्यायाम व वजन कमी करण्यामुळे मधुमेहाची सुरुवात पुढे ढकलण्यात मदत होते.
( ३) हापोथायरॉईडिझम – ६५ वर्षांनंतर १५ टक्के प्रमाणात आढळतो.
स्क्रीनिंग – दरवर्षी टी. एस. एच. (TSH) तपासणी करणे.
( ४) रजोनिवृत्तीपूर्वी होणारा रक्तस्त्राव –
अनियमित मासिक– पाळीत अति रक्तस्त्राव होणे, ही खूप सामान्य समस्या आहे. त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात – गर्भाशयात होणारे पॉलिपस, फायब्रॉईडच्या गाठी किंवा हॉर्मोन्सचे असंतुलन आणि गर्भाशयातील आतील आवरणाला सूज येणे. पण गर्भाशयाचा कॅन्सर हेही कारण असू शकते, त्यामुळे तपासणी करणे गरजेचे असते.
बऱ्याच बायका ह्या आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि वेळेवर उपचार करत नाहीत, त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन तब्येतीवर वाईट परिणाम होतो.
( ५) रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव – म्हणजे मेनोपॉझनतर परत रक्तस्त्राव होणे १० – १५ टक्के स्त्रियांमध्ये दिसून येतो. त्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर असण्याची शक्यता १० – १५ टक्के असते. त्यामुळे असा रक्तस्त्राव (जरी खूप कमी प्रमाणात झाला तरी) झाला तर ताबडतोब डॉक्टरी सल्ला घेऊन सोनोग्राफी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर हिस्टेरोस्कोपी (Hysteroscopy) व क्युरेटिंग करून गर्भाशयातील आवरण बायोप्सीसाठी पाठवायला पाहिजे.
( ६) हाडे ठिसूळ होणे ( ऑस्टोपोरोसिस) – स्त्रियांमध्ये मासिकपाळी बंद झाल्यानंतर पहिली ५ – ७ वर्षे हाडांची झीज २ – ५ टक्के प्रतिवर्षी अशा दराने होत असते.
प्रतिबंध:
अ) जीवनशैलीत बदल करणे म्हणजे समतोल आहार योग्य शारीरिक हालचाल करणे, शरीरावर ऊन घेणे (सकाळी ११ ते दुपारी २), हाडाची झीज करणाऱ्या गोष्टी टाळणे. उदा. तंबाखू दारू.
ब) आहारात योग्य प्रमाणात कॅल्शियम घेणे. दूध व दुधाचे पदार्थ, नाचणी, राजमा, सोयाबीन, चणा, चवळी, मेथी, तीळ इ.
क) हाडे ठिसूळ झाल्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा संभव वाढतो म्हणून तोल जाऊन पडणे टाळावे यासाठी घरात योग्य त्या सुविधा करून घ्याव्यात.
(७) संधिवात – २२ –४ ० टक्के प्रमाण
जोखमीची कारणे – वय, वजन, स्त्रीलिंग, पायाच्या स्नायूंचा कमकुवतपणा आणि गुडघ्यावर ठेवलेला जास्त भार (जिने चढणे, उकिडवे बसणे).
सुरुवातीच्या काळात जीवन– शैलीतील बदल व व्यायाम यांनी फायदा होतो पण नंतरच्या काळात दुखणे पराकोटीला गेले की सांधे बदलण्याची (जॉईट रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया करावी लागते.
कॅन्सरस –
( १) स्तनाचा कॅन्सर – स्त्रियांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला कॅन्सर.
जोखमीची कारणे –
- वय
- कुटुंबातील इतर व्यक्तीला स्तनाचा कॅन्सर
- स्तनाचे इतर आजार
- बी. आर. सी. ए. जीन १ व २ रियर
- लवकर पाळी येणे (< १२ वर्ष), उशिरा पाळी जाणे (> ७५ वर्ष)
- पहिले मूल उशिरा होणे
- स्तनपान न करणे
स्क्रीनिंग – ज्या स्त्रियांच्या जवळच्या कुटुंबीयांमध्ये स्तनाचा कॅन्सर झाला आहे अशांनी आनुवंशिक तपासणी करून घ्यावी व त्यासाठी कॅन्सरतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
( २) गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर
कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्युदरात पहिला क्रमांक
जोखमीची कारणे
- एचपीव्हीच्या संसर्गाने
- कमी वयात शारीरिक संबंध येणे
- एकापेक्षा जास्त जोडीदार असणे
- एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह स्थिती
- सिगरेट पिणे इत्यादी
स्क्रीनिंग – वय ३५ वर्षांनंतर -Pap Smear – दर ३ वर्षांनी – Pap+HPV +ve – दर ५ वर्षांनी
प्रतिबंध – सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण
- वय ९ ते ४५
- वय ९ ते १४ – दोन डोस
- वय १५ ते ४५ – तीन डोस
( ३) गर्भाशयाचा कॅन्सर जोखीम
- लठ्ठपणा
- मासिकपाळीचे असंतुलन अ टॅमोत्सिफेन औषध चालू असणे
प्रतिबंध –
वेळेवर तपासणी करणे.
( ४) अंडाशयाचा कॅन्सर
स्क्रीनिंग – शक्य नाही.
जेव्हा कधी काही लक्षणे दिसल्यास सोनोग्राफी करावी.