ताणतणावांचे जीवन आणि योग

Published by Prashant Iyengar on   December 14, 2018 in   Yoga Excercise

आजच्या नव्या युगात एक विलक्षण विचित्र गोष्ट घडत आहे ती अशी, आपली बहुशः कामे यंत्रे करतात. बुद्धीची कामेसुद्धा संगणक प्रणाली करू लागली आहे. पण यंत्रे संगणक आपली कामे करत असूनही ताणतणाव माणसाला येतच आहेत. कामे कमी झाली आहेत, परंतु ताणतणाव कमालीचे वाढले आहेत. आजचा माणूस ताणतणाव पेलू शकत नाही. संपदा पायाशी लोळण घेत असली तरी मनावरचा आणि डोक्यावरचा ताणतणाव आणि ताणतणावांचे जीवन अगदीच असह्य होत आहे. यंत्रांच्या मदतीने कार्यक्षमता वाढविली असली तरी ताण राक्षसासारखे मागे लागत आहेत. यांत्रिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला केवळ सोयीच दिसल्या. हा छुपा राक्षस कल्पनेतही आला नाही. पण आज हा राक्षस धुमाकूळ घालत आहे. आता स्थिती अशी आहे की यंत्रे सोडता येत नाही आणि राक्षसही सुटत नाही.

काम हा राक्षस

काम हा राक्षस आहे असे अध्यात्म सांगते. काम वाढले की ताणतणाव येतात. हा राक्षस कावेबाज असतो. तो लगोलग येत नाही. कामाला आपला पाश आवळण्यास भरपूर वेळ देतो. अध्यात्मवादी म्हणतात की चैनवाद, भोगवाद बोकाळला की काम आपल्या मोहक रूपात जाळे फैलावतो. काम-इच्छा-अपेक्षा-आकांक्षा-महत्त्वाकांक्षा ताणतणावांना खतपाणी घालतात हे निर्विवाद. जीवन साधे आणि सरळमार्गी असावे, याने ताणतणाव कमी होतात, असा तर्क काढला जातो. सर्वसामान्य जीवन जगायचे ठरविले तर ताणतणाव कमी होतील असे वाटते. हे काही अंशाने खरे असले तरी पूर्णार्थाने खरे नसते. भय, भीती, सचोटीचा अभाव यानेही ताणतणाव येतात. माफक इच्छा आकांक्षा असल्यातरी त्या बलवान असण्याने ताणतणाव येतात. माणसामध्ये जे किमान धैर्य असावे लागते. त्याचा अभाव असण्यानेसुद्धा ताणतणावांचा बोजा असह्य होतो. त्यामुळे ताणतणावांचा मुकाबला करण्यास सरळपणा, साधेपणा माफक आशा-आकांक्षा इच्छांबरोबर धैर्यसुद्धा आवश्यक असते आणि ते आत्मबल म्हणवले जाते. आता आपण थोडा व्यावहारिक विचार करूया.

एखाद्या गृहस्थाला आई आणि बायको किंवा स्त्रीला पती आणि सासूसासरे तसेच घर कुटुंब आणि समाज, वैयक्तिक जीवन व कौटुंबिक जीवन यामुळे रस्सीखेचीतील दोर बनल्याचे जाणवते. सांसारिक जीवनात कुतरओढ होऊन ताणतणाव येतात. गरजा व उत्पन्न, जमा व खर्च, प्रतिष्ठा आणि परिस्थिती या अशा अनेक द्वंद्वांना तोंड द्यावे लागते. ‘ बालपण देगा देवा ‘ असे आपण म्हणतो, पण पुढच्या वयात विनाकारण प्रतिष्ठेचे ओझे बाळगत असतो जे बालपणी नसते. तारुण्यात प्रतिष्ठा वाढविण्याचे स्वप्न बाळगून आपण ताणतणावांना निमंत्रण देत असतो, नव्हे कवटाळत असतो.

प्रतिष्ठा हा आपल्या ‘ अहम ‘चा रोग असतो. याची लागण शरीरातील ‘ मेंदू ‘ या अवयवात होते. दुसरे केंद्र म्हणजे आपले हृदय. राग, लोभ, प्रेम, जिव्हाळा, माया, ममता याचबरोबर द्वेष, मत्सर, हेवेदावे हे सगळे या भावनाकेंद्रात रुजू होतात. ताणतणाव व हृदयरोग याचा घनिष्ट संबंध असतो, हे काही सांगावे लागत नाही. म्हणजे या दुसऱ्या केंद्राचासुद्धा विचार घ्यावा लागतो. आता तिसरे केंद्र म्हणजे वासनाकेंद्र. सर्व जीवांना लैंगिक जीवन असते. लैगिकतेमुळेसुद्धा ताणतणाव येतात. जेव्हा त्याचे व्यवस्थापन संस्कृतीने, सांस्कृतिक मूल्य जोपासने होते तेव्हा ताणतणाव येत नसतात. त्यासाठीच कामपुरुषार्थ व गृहस्थाश्रम दिला आहे व त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. पण आपण जर त्यातील धर्म झुगारला तर वासनागणिते चुकतात आणि ताणतणावांची जबरदस्त लागण होते. अशी ही तीन केंद्रे असतात व यांचे व्यवस्थापन नसेल तर जीवनाची गणिते चुकतात व ताणतणावसह अस्वास्थ, अनारोग्य वाढते.

योगशास्त्रात या तीन व्यवस्थापनांचा उत्तम विचार आहे. या तीन केंद्रांचे व्यवस्थापन करण्यास आसन, प्राणायाम, क्रिया, मुद्रा, बंध आहेत. वैचारिक संस्कृती व भावनिक संस्कृती देणारे तत्त्वज्ञान आहे. शरीरांतर्गत चक्रे, ग्रंथी, प्राण आदींचा विचार आहे आणि तंत्रसुद्धा आहे.

‘योग: चित्तवृत्ती निरोध: ‘ अशी योगाची व्याख्या केली जाते. याचा अर्थ असा की एखाद्या शांत जलाशयाप्रमाणे मन निर्विकार, शांत करणे म्हणजे योग. आपल्या मनात सतत विचारांची आवर्तने सुरू असतात. झोपेतही मन विचार करीत असते. सतत श्रमण करीत असते. अशा अस्थिर मनाला स्थिर, निर्विकार करण्यासाठी योगशास्त्रात अनेक साधने सांगितली आहेत. योगशास्त्र मनाचा आणि शरीराचा मेळ बसविणारे शास्त्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि म्हणूनच योग म्हणजे केवळ योगासने नाहीत तर ती एक पूर्वतयारी आहे. पण भारतात मात्र योगाचा प्रसार हा प्रामुख्याने योगासनांच्या अंगाने झालेला दिसतो.

योगशास्त्रात आठ अंगे आहेत, ज्यांना आपण अष्टांगयोग म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगांची आठ उपांगे आहेत. योग आज अनेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि त्याचे फायदे आता इतरांच्याही लक्षात येऊ लागल्याने त्याचा अंगीकार केला जाऊ लागला आहे. असे असले तरी योग म्हणजे केवळ आसने नाहीत तर योग मुख्यतः मानसिक आहे हे जाणले पाहिजे. योगशास्त्राचा उद्देश शरीर आणि मन शुद्ध व भक्कम करणे हा आहे.

प्राणायाम

इतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबद्ध अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम म्हणतात. प्राणायाम पूरक-कुंभक-रेचक या नावाने ओळखला जातो. पूरक म्हणजे चार सेकंदांसाठी श्वास आत घेणे, कुंभक म्हणजे १६ सेकंदांसाठी श्वास आत ठेवणे आणि रेचक म्हणजे ८ सेकंदांत श्वास सोडणे. श्वास आत घेताना नाकाच्या मोकळ्या बाजूने सुरुवात करून दुसऱ्या बाजूने सोडावे. पुढच्या श्वसनाच्या वेळी नाकाच्या उलट बाजूने सुरुवात करावी. सुरुवातीस दीर्घ श्वसन शिकणे हे सर्वात सुरक्षित व सोपे असते. उताणे पडून पोटाने संथ श्वसन केल्यास मन लवकर शांत होते.

सूर्यनमस्कार

एक परिपूर्ण व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. याच्या बारा अवस्थांमध्ये संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार घातले तर स्नायूंना व्यायाम मिळतो, श्वसनाचा व्यायाम होतो, शरीर योग्य प्रमाणात ताणले जाते, पोटातील अवयवांना व्यायाम होतो, शरीराची लवचिकता वाढते, हृदयाला रक्ताभिसरण चांगले होते. असे अनेक फायदे सूर्यनमस्कार घातल्यामुळे होतात. मन प्रसन्न करण्यासाठी याचा उपयोग होतो. मनावरील ताण हलका होऊन मन शांत होते. रोज किमान बारा सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. रोज जिमला जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी रोज बारा सूर्यनमस्कार घालावे.

आजकाल व्यायाम म्हणजे ‘ जिम ‘मधील अत्याधुनिक साधन सामुग्रीच्या आधारे करतात तो व्यायाम असे मानले जाते, पण प्रत्येक ठिकाणी अशी उपकरणे उपलब्ध असतीलच असे नाही. सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम यात सातत्य ठेवले तरी अनेक आजार आणि मानसिक ताण यापासून तुम्ही दूर राहाल. योगासनांमध्ये कोणतीही बाह्य उपकरणे न वापरता शरीराच्याच अवयवांनी दाब देणे, शरीर योग्य पद्धतीने ताणणे, पुन्हा सरळ रेषेत आणणे या गोष्टी साध्य करता येतात… फक्त त्यासाठी हवा थोडा वेळ आणि इच्छाशक्ती!