मसालेवाले आलू विथ खीर
मसालेवाले आलू
इस्लामिक कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात अनेकांकडे खीरपुरीचा नियाज (प्रसाद) केला जातो. तांदळाच्या दाटसर खिरीसोबत पुरी, करंजी किंवा खाजा खाण्याची पद्धत आहे. ह्या गोडाची चव वाढविण्यासाठी सोबत रगडा/चणामसाला किंवा मसालेवाले आलू बनवले जातात.
साहित्य॒: १/४ किलो गोल छोटे बटाटे, १/२ कप चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे तेल, सजावटीसाठी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पाने, मीठ, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, तळण्यासाठी तेल.
मसाला: २-३ काश्मिरी मिरच्या, २-३ हिरव्या मिरच्या, १ छोटा चमचा धणे, १/२ छोटा चमचा जिरे, ११/२ छोटा चमचा बडीशेप, १/४ छोटा चमचा मेथीदाणे, १/४ छोटा चमचा काळेमिरे, २ लवंग, लहान तुकडा दालचिनी.
कृती: बटाटे उकडून त्याची साले काढून घ्या. बटाट्याला काट्याने टोचे मारून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात बटाटे खरपूस तळून घ्या. हिरवी मिरची वगळता बाकीचे सर्व मसाले कोरडे परतून घ्या. पूड तयार करा. हिरव्या मिरच्या ठेचून घ्या. पसरट भांड्यात दोन मोठे चमचे तेल गरम करा. त्यात आले-लसूण पेस्ट घालून परता. त्यानंतर त्यात चिंचगुळाची चटणी, मसाला पूड, हिरवी मिरची घालून तेल सुटेस्तोवर परतवून घ्या. मीठ घालून त्यात तळलेले बटाटे घालून थोडेसे पाणी घाला. मंदाग्नीवर ठेवा. कोथिंबीर आणि पुदिन्याने सजवा.
खीर
साहित्य: १/४ कप बासमती किंवा आंबेमोहर तांदूळ, ६ कप दूध, १ कप साखर, १ छोटा चमचा वेलची पूड, १ मोठा चमचा साजूक तूप, चारोळी व केशर.
कृती: तांदूळ स्वच्छ धुऊन सुकवून घ्या. तांदूळ सुकल्यानंतर मिक्सरमध्ये रव्यासारखे होईपर्यंत वाटून घ्या. जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप घालून मिक्सरमध्ये वाटलेला तांदळाचा रवा घाला. मंदाग्नीवर परतवून घ्या. दूध घाला. सतत ढवळत राहा. रवा शिजल्यानंतर साखर घाला. केशर गरम करून खिरीत घाला. वेलचीपूड व चारोळी घालून सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मोहसिना मुकादम