ताक… आहे इंद्रालाही दुर्लभ तरी! | वैद्य अश्विन सावंत | Buttermilk…Even Indra is rare! | Dr. Ashwin Sawant

Published by वैद्य अश्विन सावंत on   October 1, 2022 in   Food CornerKalnirnay MarathiOctober 2022

ताक… आहे इंद्रालाही दुर्लभ तरी!

ताक अखिल भारतीयांचे आवडते पेय. दह्याचे मंथन केल्यावर त्यामधील स्नेह (लोणी) वेगळे करून त्यात एक-चतुर्थांश किंवा अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळल्यानंतर चवीला जो गोड-आंबट व तुरट द्रवपदार्थ तयार होतो, त्याला ‘ताक’ (संस्कृतमध्ये ‘तक्र’) म्हणतात. ताक हे बहुगुणी असून आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. ‘तक्रं शक्रस्य दुर्लभं’ अर्थात इंद्रालाही दुर्लभ असे पृथ्वीवरचे अमृत या शब्दांत ताकाची महती गायली जाते. मात्र कोणताही खाद्यपदार्थ हा केवळ गुणांनीच भरलेला असतो, त्यामध्ये कोणतेही दोष नसतात असा एकांगी विचार आयुर्वेद शास्त्र करत नाही. ताकामध्ये उत्तम गुण आहेत, तसे काही दोषही आहेत.

ताकाचे गुण

पचनानंतर ताक शरीरावर गोड रसाचा परिणाम दाखवते. ताक पचायला हलके असून आंबट-गोड चवीमुळे जिभेची चव वाढवते. तसेच ते भूक वाढविणारे आहे. साहजिकच अन्नाचे पचन होण्यासाठी बहुतांश लोक ताक पितात. ताजे ताक सहसा घशाशी जळजळत नाही. लोणीयुक्त ताक शरीरामध्ये कोरडेपणा वाढवत नाही. ताक प्यायल्यावर शरीराला टवटवी व मनाला तृप्ती मिळते, थकवा दूर होतो आणि याच गुणांसाठी ताक उन्हाळ्यात प्यायले जाते. ताक मलाला घट्टपणा आणते व मूत्र सुटण्यास साहाय्यक होते. ताक मुख्यत्वे कफ व वातशामक असले तरी तीनही दोषांवर परिणामकारी आहे. गोड, आंबट चवीचे, स्नेहयुक्त व जरा घट्ट असलेले ताक हे वातशामक असते. गोड व तुरट चवीचे असल्याने आणि पचनानंतर गोड परिणाम करत असल्याने ताक पित्तशामक आहे तर तुरट चव, रुक्ष व उष्ण गुण आणि शरीरातील संकोचलेले मार्ग मोकळे करणार असल्याने कफशामकही आहे.

ताक थंड का उष्ण?

‘गुणांनी थंड आहे,’ हा ताकाबद्दलचा मोठा गैरसमज आहे. कारण प्रत्यक्षात ताक उष्ण आहे, अर्थात शरीरात उष्णता वाढवते. ताक थंड मडक्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवून गार केलेले असले, तरी ते स्वतःचा उष्ण गुण सोडत नाही.

ताकाचे प्रकार व त्यांचे गुणधर्म

गायीच्या दुधापासून तयार केलेले दही घुसळून बनवलेले ताक हे जिभेवर चव आणणारे, भूक व पचन सुधारणारे, बुद्धिवर्धक, मूळव्याध व जलोदर या रोगांमध्ये उपयुक्त आणि वात-पित्त-कफ या तीनही दोषांना शामक व पथ्यकर असते. तर म्हशीच्या दुधापासून तयार केलेले दही घुसळून बनविलेले ताक हे किंचित घट्ट असून प्लीहावृद्धी, मूळव्याध, संग्रहणी व जुलाब या रोगांमध्ये हितकारक असले तरी कफ व सूज वाढवणे हे त्याचे दोष आहेत.

ताकाचे दोष

न मुरलेल्या दह्यापासून तयार केलेले कच्चे ताक पोटातला कफ नष्ट करते, मात्र घशामध्ये कफ वाढवते. ताक प्यायल्यानंतर अनेकांचा (विशेषतः वातप्रकृती व्यक्तींचा) घसा धरतो, तो ताकाच्या या दोषामुळे. याचसाठी गायक, संवादक, संभाषक, वक्ते, अभिनेते वगैरे मंडळी ज्यांच्या कामामध्ये बोलण्याचे महत्त्व आहे त्यांनी ताक, खास करून कच्चे ताक टाळावे. श्वसनविकारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनीसुद्धा ताक टाळावे. तर स्नेह (लोणी)विरहित ताकामुळे शरीरात कोरडेपणा वाढून तळहात-तळपायांना भेगा पडणे, गुदमार्ग कोरडा होणे, नाक, डोळे, केस वगैरे अवयव कोरडे होणे आदी समस्या उद्भवतात. त्यामुळे लोणीविरहित ताक पिऊ नये.

उन्हाळ्यामध्ये ताक

उन्हाळ्यामध्ये आपण सगळेच ताक पितो. पण सुश्रुत संहितेत तसेच अष्टाङ्ग संग्रहकार वाग्भटानेसुद्धा उष्ण काळात ताक पिऊ नये, असे सांगितले आहे. हारीतसंहिता व भावप्रकाश या ग्रंथांनीसुद्धा उन्हाळ्यात ताक पिण्यास विरोध केला आहे. ग्रीष्म (एप्रिल-मे) व शरद (पावसाळ्यानंतरचे ऑक्टोबर हिटचे दिवस) या ऋतूंमध्ये ताक पिणे शरीरास बाधते.

कोणत्या ऋतूमध्ये ताक प्यावे?

आयुर्वेदाने उष्ण ऋतूमध्ये नाही तर शीत ऋतूमध्ये ताक प्यावे, असा सल्ला दिलेला आहे. शीत ऋतू (हेमंत व शिशिर) म्हणजे साधारण नोव्हेंबर मध्यापासून ते फेब्रुवारी मध्यापर्यंतचा थंडीच्या मोसमात ताक प्यावे.

ताक कसे प्यावे?

वात विकारांमध्ये सुंठ व सैंधव मीठ मिसळून आंबट ताक प्यावे. पित्त रोगामध्ये खडीसाखर मिसळून गोड ताक प्यावे आणि कफ विकृतींमध्ये सुंठ, मिरे, पिंपळी व यवक्षार मिसळून ताक प्यावे. भाजलेले जिरे व सैंधव मिसळलेले ताक सर्वांसाठी हितकर समजावे. एक ग्लास ताकामध्ये एक वा दोन चिमूट इतक्या मात्रेमध्ये हे पाचक पदार्थ व्यवस्थित मिसळून ताकाचे सेवन करावे.

ताक कधी प्यावे?

  • आयुर्वेदानुसार स्थूल शरीराच्या मेदस्वी व्यक्तींनी जेवणापूर्वी ताक प्यावे.
  • भूक वाढावी व खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी जेवताना अधूनमधून घोट-घोट ताक प्यावे.
  • कृश व्यक्तींनी जेवणानंतर ताक प्यावे.
  • मात्र पोटभर जेवल्यानंतर त्यावर पुन्हा ताक पिणे योग्य नाही.
  • अन्नाचे पचन होण्यासाठी जेवणानंतर पाऊण-एक तासाने ताक प्यावे.

ताक कोणी पिऊ नये?

  • शरीरावर जखमा झालेल्या तसेच जखमेमध्ये सूज असलेल्या (सर्जरीनंतर जखमा व टाके भरेपर्यंत ताक वर्ज्य केले पाहिजे) व्यक्तींनी.
  • शरीरावर कुठेही गळू किंवा गळवांमध्ये सूज असताना तसेच ज्यांना वारंवार अंगावर फोड-गळू उठतात त्यांनी.
  • आम्लपित्तामध्ये ज्यांना घशात, छातीत, पोटात जळजळते, आंबट पित्त तोंडात येते किंवा तोंड आंबट होते त्यांनी.
  • चक्कर येत असल्यास किंवा शुद्ध हरपली आहे अशा व्यक्तींनी.
  • दाह रोगामध्ये (हातापायांची, डोक्याची किंवा शरीरामध्ये कुठेही आग होत असताना).
  • ‘लॅक्टोज इन्टॉलरन्स’ (दूध प्यायल्यावर अपचन, पोटदुखी, गॅसेस, जुलाब, त्वचेवर अॅलर्जी, खोकला-दमा वगैरे त्रास होतो तेव्हा)ची समस्या असणाऱ्यांनी.
  • शरीरामध्ये उष्णता वाढल्याने होणाऱ्या त्वचाविकारांमध्ये.
  • अंगावर पित्ताच्या गांधी उठून खाज येते, ओठ-डोळे सुजतात तेव्हा.
  • रक्तपित्त (शरीराच्या तोंड, नाक, कान, गुद, मूत्र वगैरे कोणत्याही मार्गाने, तसेच डोळ्यांमध्ये, त्वचेखाली किंवा शरीरामध्ये कुठेही रक्तस्राव होत असेल) तर.
  • जे अशक्त-दुर्बल आहेत त्यांनी ताक पिऊ नये.
  • शरीरावर कुठेही सूज असताना.
  • हत्तीरोग, गालगुंड, आमवात या आजारात.
  • नुकत्याच आलेल्या अल्प मुदतीच्या तापात तसेच वारंवार शिंका व नाकातून पाण्यासारखा स्राव वाहणे अशा प्रकारच्या सर्दीमध्ये ताक वर्ज्य करणे.
  • घसादुखी, घसा बसणे, आवाज घोगरा येणे, कोरडा खोकला व त्यामुळे दमा अशा श्वसनविकारांमध्ये ताक पिऊ नये.

कोणत्या रोगांमध्ये ताक पथ्यकर

  • तोंडाची चव वाढवणे व अन्नाचे पचन करणे हे ताकाचे श्रेष्ठ गुण असल्याने ज्या रोगांमध्ये तोंडाची चव जाते, भूक लागत नाही व अन्नपचन नीट होत नाही त्या रोगांमध्ये ताक उपयोगी आहे. अशा वेळी चिमूटभर सैंधव वा पादेलोण घालून ताक प्यावे.
  • ज्या आजारामध्ये पोटात वायू फिरून पोटफुगीला (वायुगोळा) व  पोटदुखीला कारणीभूत होतो तेव्हा चिमूटभर भाजलेला ओवा, भाजलेले हिंग व सैंधव मिसळून किंवा हिंग्वाष्टक चूर्ण घालून ताक प्यावे.
  • तोंडामध्ये अधिक लाळ सुटून तोंडाला सारखे पाणी सुटते तेव्हा सुंठ व साखर घालून गोड ताक प्यावे.
  • पचायला हलके, भूक वाढवून पचन सुधारणारे व मलाला घट्ट करणारे या गुणांमुळे संग्रहणी या आजारात ताक पथ्यकर सिद्ध होते.
  • जुलाबानंतर शरीराला आलेला थकवा भरून काढण्यासाठी चिमूटभर सैंधव मीठ आणि अर्धा चमचा खडीसाखर मिसळून ताक प्यावे.
  • प्लीहावृद्धी या रोगामध्ये रक्त-रोहिड्याचे चूर्ण घालून ताक प्यावे.
  • आंत्रपुच्छ-दाह (अपेन्डिसायटीस) या आजारामध्ये भाजलेल्या ओव्याची पूड घालून ताक प्यावे.
  • मूळव्याधीच्या आजारात ताक अमृतासम समजले जाते. (दही मात्र कटाक्षाने वर्ज्य करावे.)
  • अपचनात भाजलेले जिरे, हिंग व सैंधव मीठ घालून किंवा मलावरोध असताना भाजलेल्या हरड्याच्या चूर्णासह सस्नेह ताक प्यावे.
  • वारंवार तहान लागत असेल व पाणी पिऊनही तहान भागत नसेल तर वाळा, धणे व जिरे यांची चिमूटभर पूड घातलेले ताक लाभदायक ठरते.
  • शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी वावडिंगाचे चूर्ण घालून प्यावे.
  • दीर्घ मुदतीच्या तापानंतर सहज पचणारा पथ्याचा आहार म्हणून व थकवा घालविण्यासाठी (मात्र सर्दी, कफ, खोकला या लक्षणांसह आलेल्या तापानंतर ताक वर्ज्य).
  • पांडुरोग म्हणजे शरीरामध्ये रक्तक्षय असताना ताक हा पथ्यकर पदार्थ आहे. वास्तवात रक्तक्षयामध्ये आवश्यक लोह हा घटक ताकामध्ये केवळ ०.१ टक्के इतक्या अत्यल्प मात्रेमध्ये असतो. परंतु रक्तक्षयाच्या व्यक्तीला भूक लागून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन व्हावे, लोहाचे शोषण व्हावे या हेतूने आणि रक्तामधील द्रव भाग वाढण्यासाठी ताक उपयुक्त आहे. अशा वेळी चिमूटभर शुद्ध मंडूर भस्म घालून प्यावे.
  • वृद्धि म्हणजे हर्निया, जलोदर या आजारांमध्येही ताक हितकारक आहे.
  • हृदयरोगासाठी अर्जुन चूर्ण घालून ताक प्यावे. संशोधनात ताक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास साहाय्य करते, असे दिसून आले आहे.
  • मूत्रकृच्छ (वेदनेसह थांबून-थांबून अडखळत लघवी होत असेल तेव्हा) आणि मूत्राघात (लघवी अडते तेव्हा) या आजारात चंदन, धणे व जिरे घालून ताक प्यावे. प्रमेह (जेव्हा वारंवार मूत्रप्रवृत्ती होते) तेव्हा आवळा चूर्ण व हळद घालून ताक प्यावे.
  • स्थूल व्यक्तींनी शरीर कृश व्हावे यासाठी ताक-भात खावा. ताकामुळे रक्तामधील कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईड्स कमी होतात, असे संशोधकांच्या निरीक्षणास आले आहे.
  • कोणत्याही आजारानंतर सहज पचेल असा पथ्याचा आहार घेताना ताक उपयुक्त.
  • तूप जास्त मात्रेमध्ये खाल्ल्यावर मळमळ, तोंडाला पाणी सुटणे, पोट जड होणे वगैरे लक्षणे दिसतात. यावरचा हमखास उतारा म्हणजे सुंठ वा हिंग घातलेले ताक.

संदर्भग्रंथ

  • सुश्रुतसंहिता
  • पथ्यापथ्यविनिर्णय
  • अष्टाङ्गसंग्रह
  • अष्टाङ्गहृदय
  • भावप्रकाश
  • हारीतसंहिता
  • चरकसंहिता द्य शब्दकल्पद्रुम
  • Nutritive value of Indian foods.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैद्य अश्विन सावंत

 (लेखक अनुभवी आयुर्वेदिक चिकित्सक आहेत.)