भाजणी च्या पिठाचे सँडविच
साहित्य: १०० ग्रॅम थालीपिठाच्या भाजणी चे तिखट-मीठ घातलेले पीठ , ४ छोटे चमचे आंबट दही, १ छोटा चमचा इनो, १ छोटा चमचा तेल, २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा कांदा-लसूण मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी चीज.
कृती: प्रथम भाजणीच्या पिठात दही आणि अर्धा छोटा चमचा तेल घालून कोमट पाण्यात ते ढोकळ्याच्या पिठाप्रमाणे चांगले फेटून घ्या. एकीकडे स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. फेटलेल्या पिठात इनो घालून परत फेटून घ्या. ते तयार पीठ तेल लावलेल्या पसरट भांड्यात ओता आणि ते स्टीमरमध्ये पंधरा मिनिटे वाफवून घ्या. नंतर भांडे बाहेर काढून गार होऊ द्या. तोपर्यंत उकडलेले बटाटे कुस्करून बारीक करा. त्यात तिखट, मीठ, कांदा-लसूण मसाला, गरम मसाला आणि लिंबूरस घालून मळून घ्या. भांडे गरम झाल्यावर फुगून आलेल्या बेसच्या कड्या सुरीने सोडवून घ्या. तव्यावर तेल पसरवून हा बेस एका बाजूने भाजून घ्या. भाजलेली बाजू खाली येईल, अशा रीतीने बेस ताटलीत काढून घ्या. सुरीने मधोमध कापून ह्या बेसचे दोन अर्धगोल करा. एका अर्धगोलावर चिरलेली कोथिंबीर, बटाटा, कांदा आणि परत कोथिंबीर असे थर पसरवा. यावर दुसरा अर्धगोल अशा रीतीने दाबून बसवा, की भाजलेली बाजू वर येईल. सजावटीसाठी वर चीज किसून घाला. त्रिकोणी आकारात कापून सँडविच लोणच्याबरोबर अगर सॉसबरोबर सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मेघना परांजपे, पुणे