कर्म, उपासना आणि ज्ञान | भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर | Karma, worship and knowledge | B.P. Chaitanya Maharaj Degalurkar

Published by भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर on   January 5, 2022 in   Readers Choice

कर्म, उपासना आणि ज्ञान

भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या साधनत्रयीवर सर्व विचार संप्रदायांचा भर आहे. त्यातही कोणी (पूर्वमीमांसा) कर्माला प्राधान्य देतात, वैष्णव मत उपासनेला महत्त्व देते, तर उत्तरमीमांसा (अद्वैतमत) ज्ञानास श्रेष्ठ मानते. यामधील मतांतरे आणि तरतमभावविचार बाजूला ठेवला तर या साधनत्रयींना दिलेली मान्यता सर्वमान्य आहेच. अर्थात, त्यातही कोणी समुच्चयवादी आणि कोणी समन्वयवादी आहेत. परंतु या साधनत्रयीनेच मानवी जीवनाची धन्यता होते यावर एकमत आहे. कारण, या साधनत्रयीचा विचार आस्तिक दर्शनांनी विशेषत्वाने केला असून वेदाचे रूप त्रिकांडात्मक मानले गेले आहे.

ही तीन कांडे म्हणजेच कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड होय.

त्यामुळे श्रुती पाठोपाठ येणारी

प्रमाणांची मालिका आणि ग्रंथ-मालिकाही कांडत्रयरूप मानले गेले आहेत. श्रीमद्भगवद्गीतेबद्दल सांगताना श्रीज्ञानेश्वर महाराजांनी,

एवं कांडत्रयरुपणी। श्रुतीचि हे कोडिसवाणी। गीता पद्यरत्नांची लेणी। लेयिली आहे॥

असे म्हटले आहे. या तीनही कांडांचा समन्वय अद्वैत तत्त्वज्ञान परंपरेमध्ये मानला जातो.

प्रस्तुत लेखामध्ये श्रीज्ञानेश्वरीतील काही ज्ञानलक्षणांचा विचार करायचा आहे. मानवी जीवनामध्ये ज्ञानाचे विशेष महत्त्व आहे. ज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व अन्वयापेक्षा व्यतिरेकाने अधिक पटवून दिले आहे.

‘तमेव विदित्वाऽति मृत्युमेति नान्यः पन्था विद्यतेऽयनाय॥’ अशी श्रुती आहे. ज्ञानाशिवाय अमृतस्वरूपासाठी दुसरा मार्ग नाही आणि अन्य कोणते उपाय केले तर श्रीज्ञानेश्वर महाराज भगवन्मुखातून सांगतात,

वाचूनि ज्ञानेंवीण एके। उपाय करिसी जितुके। तिही गुंफसि अधिके। रुखी इये।

किंवा नवव्या अध्यायातही भगवान म्हणतात,

ग्रासाएका अन्नासाठी। अंधु धावताहे किरीटी। आडळला चिंतामणि पायें लोटी। आंधळेपणे॥

तैसे ज्ञान जै सांडूनि जाये। तै ऐसी हे दशा आहे।

म्हणोनि किजे ते केले नोहे। ज्ञानेवीण॥

तात्पर्य, ज्ञानाशिवाय मनुष्य जीवन पशुवत असते. केवळ आहार, निद्र्रा, भय, विषयभोग हे मानवी जीवनाचे ध्येय कधीच नसते. वेदांतामध्ये समोरची वस्तू डोळ्यांस दिसते अथवा इंद्रियांना प्रतीत यास ज्ञान म्हणत नाहीत. महाभारतामध्ये यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मराज युधिष्ठिर सांगतात ‘ज्ञानं तत्त्वार्थसम्बोधः।’ म्हणजे परमतत्त्वाचा यथार्थ बोध हेच ज्ञान असते. म्हणून वेदांत मतामध्ये ज्ञानाचे, स्वरूपज्ञान आणि वृत्तीज्ञान असे दोन प्रकार केले आहेत.

परब्रह्माचे ज्ञान वा आत्मस्वरूपाचे ज्ञान हेच स्वरूपज्ञान असते आणि तदितर ज्ञाने वृत्तीज्ञान म्हणजे एका अर्थाने अज्ञानीच असतात.

श्रीज्ञानेश्वर महाराज श्रीज्ञानेश्वरीच्या

तेराव्या अध्यायामध्ये, ‘अध्यात्मज्ञाननित्यत्वं  तत्त्वज्ञानार्थदर्शनम्।’ या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात,

तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तु असे।

ते जया दिसे। ज्ञानास्तव॥

ते एकवाचून आने। जिये भवस्वर्गादिज्ञाने।

ते अज्ञान ऐसे मने। निश्चयो करी॥

म्हणजेच स्वरूपज्ञान, जे आत्मदर्शन घडविते, तेच मोक्षास कारण आहे. त्या ज्ञानाचा परिचय होणे महत्त्वाचे आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या काही ज्ञानलक्षणांचा येथे थोडा विचार करायला हवा.

श्रीज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञाचे श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात,

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परंतप ।

सर्व कर्माखिल पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥

सरलार्थ असा की, अर्जुना, द्र्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारच्या सर्व कर्माची परिसमाप्ती ज्ञानामध्ये होते. यावर व्याख्यान करताना श्रीज्ञानेश्वर महाराज ज्ञानमाहात्म्य प्रतिपादन करतात आणि ज्ञानाची लक्षणे सांगताना म्हणतात,

जे धावतया कर्माची लाणी। नैष्कर्म्यबोधाची खाणी

जे भुकेलिया धणी। साधनांची॥

जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली। तर्काची दिली गेली। जेणे इंद्रिये विसरली। विषयसंगु॥ मनाचे मनपण गेले। जेथ बोलाचे बोलपण ठेले। जयामाजि सापडले। ज्ञेय दिसे॥

जेथ वैराग्याचा पांगु फिटे। विवेकाचाही सोसु तुटे। जेथ न पाहता सहज भेटे। आपणपें॥ (ज्ञाने. अध्या. ४, ओवी १६१-१६४)

ही सर्व स्वरूपज्ञानाची लक्षणेच आहेत. स्थलमर्यादेमुळे या सर्व लक्षणांचा विस्तृत विचार करणे शक्य होणार नाही.

ज्ञानाचे लक्षण करताना श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

ज्ञान ते की ज्यामध्ये कर्माची धाव थांबते. मानवी जीवनामध्ये कर्माची अपरिहार्यता आहे. ‘नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।’ असे भगवान म्हणतातच! जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे, शरीर आहे तोपर्यंत कर्म करावेच लागणार हे निश्चित! आणि कर्म घडले, की त्याचा पाप-पुण्यात्मक परिणामही अपरिहार्य असतो. ते पापपुण्य भोगण्यासाठी पुन्हा जन्ममरणाचे संसरणही जीवासाठी अनिवार्य होते. त्यासाठी कर्म आणि कर्मफल थांबणे आवश्यक आहे. त्यापैकी जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म थांबणे शक्य नाही. कर्माचे महत्त्व आणि अस्तित्व त्याचवेळी मानले जाते, ज्यावेळी त्या कर्मातून कर्मफळाची (अपूर्वाची) प्राप्ती होते. म्हणून

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

आवडतिये फळी। असारे साली आंठोळी।

त्यासाठी अवगळी। फळाते कोण्ही॥ तैसा कर्तृत्वाचा मदु। आणि कर्मफळाचा आस्वादु।

या दोहीचे नांव बंधु। कर्माचा की॥ (१८-२०४.२०५.)

म्हणजे कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलासक्ती जर निवृत्त झाली तर कर्म प्रतिबंधक होणार नाही. जीवाला ब्रह्मभिन्न आणि विश्वाभासाला सत्य मानून कर्माचा व्यवहार होतो ती परिच्छन्नता आणि तो भ्रम ज्ञानाने निवृत्त होतो आणि कर्माची धाव थांबते. भगवान श्रीमद्भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतात,

‘यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः।

आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते॥’

सरलार्थ असा, जो आत्मरत आहे, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट आहे, त्यांस काही कार्य राहत नाही. यावर श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

देखे असतेनि देहधर्मे । एथ तोचि एकु न लिंपे कर्मे । जो अखंडित रमे। आपणपांचि॥

जे तो आत्मबोधे तोषला। तरी कृतकार्यु देखे जाहला। म्हणोनि सहजे सांडवला। कर्मसंगु॥

बृहदारण्यकोपनिषदामध्ये म्हटले आहे,

आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पूरुषः।

किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत्॥

ही श्रुतीही त्याच अर्थाची आहे. याचा अर्थ ब्रह्मज्ञानानंतर त्या देहाकडून कर्म घडतच नाही किंवा मागील कर्माचे (प्रारब्धाचे) त्यास फळच प्राप्त होत नाही असे नाही. बाधित अनुवृत्तीने आणि देह आहे तोपर्यंत आत्मज्ञानी कर्म करतो आणि प्रारब्धभोगही भोगतो पण त्यातून कोणते पाप-पुण्यात्मक अपूर्व आणि सुख-दुखात्मक फल त्यांस प्राप्त होत नाही. म्हणूनच श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ‘धांवतया’ हे पद या लक्षणामध्ये घातले आहे.

यापुढील लक्षण सांगताना श्रीज्ञानेश्वर महाराज ज्ञानास ‘नैष्कर्म्यबोधाची खाण’ म्हणतात. नैष्कर्म्यबोध म्हणजे आत्म्याच्या अकर्तृत्वाचे भान होय.श्रीज्ञानेश्वर महाराजांनी चौथ्या अध्यायामध्ये यावर सदृष्टांत विवेचन केले आहे,

जैसा का जळापाशी उभा ठाके। तो जरी आपणपे जळामाजी देखे। तरी तो निभ्रांत वोळखे। म्हणे मी वेगळा आहे॥ अथवा नावे हन जो रिगे। तो थडियेचे रुख जाता वेगे।

तोचि साचोकारे जो पाहो लागे। तव रुख म्हणे अचळ॥

तैसे सर्व कर्मी असणे। ते फुडे मानुनि वायाणे। मग आपणपें जो जाणे। नैष्कर्म्यु ऐसा॥

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे। जैसे न चलता सूर्याचे चालणे। तैसे नैष्कर्म्यत्व जाणे। कर्मीचि असता॥

हाच नैष्कर्म्यबोध आहे. पुढे अठराव्या अध्यायातही भगवन्मुखातून बोलताना श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

वेदरायाचिया राजधानी। सांख्य वेदांताच्या भुवनी। निरुपणाचा निशाणध्वनी। गर्जती तिये॥

जे सर्वकर्मसिद्धीलागी। इयेची मुद्दले हो जगी। तेथ न सुवावा अभंगी। आत्मराजु ॥

हे नैष्कर्म्यबोधाच्या खाणीचेच म्हणजे ज्ञानाचेच वर्णन आहे. आत्मा अकर्ता आहे, हेच येथे स्पष्टपणे सांगितले आहे. व्यापकाच्या ठिकाणी अकर्तृत्व असते असा सिद्धांत आहे. आत्म्याचे व्यापकत्व निरपेक्ष आहे. श्रीतुकाराम महाराज म्हणतात,

देश काळ वस्तु भेद मावळला।

आत्मा निर्वाळला विश्वाकार॥

देश, काळ आणि वस्तुपरिच्छिन्न आत्मा नाही. तो एक आहे, नित्य आहे, सर्वांतर्यामी आहे. त्या परमात्म्याचे एकपण विभुत्व सिद्ध करते आणि विभुत्व अकर्तृत्व सिद्ध करते. यापुढील लक्षण श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात,

‘जे भुकेलिया धणी। साधनांची॥’ म्हणजे मुमुक्षुंनी केलेल्या साधनांची पूर्णता म्हणजे ज्ञान होय. साधनांचा अवलंब मोक्षासाठीच केला जातो आणि अद्वैत वेदांताच्या दृष्टीने मोक्ष हा ज्ञानस्वरूप आहे. त्या साध्याची म्हणजे ज्ञानस्वरूप मोक्षाची प्राप्ती झाली, की साधनपरंपरा थांबते. म्हणजेच ज्याच्या प्राप्तीत साधनांची आवश्यकता संपते ते ज्ञान होय! श्रीज्ञानेश्वर महाराजांनी तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटले आहे,

तृप्ति जालिया जैसी। साधने सरती आपैसी।

देखे आत्मतुष्टी तैसी। कर्मे नाही॥

जववरी अर्जुना। तो बोध भेटेना मना। तवचि यया साधना। भजावे लागे॥

साधकाची सर्व धावाधाव ही ब्रह्मज्ञानापर्यंत असते. श्रीतुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर,

याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा॥ १॥

आता निश्चिंतीने पावलो विसावा। खुंटलिया धावा तृष्णेचिया॥ २॥ कवतुक वाटे झाले या वेचाचे। नाम मंगळाचे तेणे गुणे॥ ३॥

तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी॥ ४॥

अशी अवस्था म्हणजेच सर्व साधनांची धणी होय. ज्ञान ही साधनांची धणी आहे, याचा अर्थ ज्ञानानंतर कोणतेही प्राप्तव्य शिल्लक नसणे होय. प्राप्तव्य नसणाऱ्यास कोणते कर्तव्यही नसते, पंचदशीकार म्हणतात,

धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्य मे न विद्यते किंचित्। धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमद्यसंपन्नम्॥

सरलार्थ असा की, मी मला कोणतेही कर्तव्य उरले नाही म्हणून मी धन्य आहे, धन्य आहे. आज माझे सर्व प्राप्तव्य मला प्राप्त झाल्यामुळे मी धन्य आहे, कृतार्थ आहे. श्रीतुकाराम महाराजही याच अर्थाने म्हणतात,

काम नाही काम नाही। झालो पाही रिकामा॥ फावल्या त्या करू चेष्टा। निश्चळ द्रष्टा बैसोनि॥

ब्रह्मज्ञानानंतर साधनांची प्रवृत्ती थांबते, या अर्थाने श्रीज्ञानेश्वर महाराज सर्व साधनांची परिपूर्ती करणारे ज्ञान असे ज्ञानाचे लक्षण करतात. आणखीही लक्षणे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी श्रीज्ञानेश्वरीमध्ये केली आहेत. पण विस्तारभयास्तव येथे थांबतो.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


.. चैतन्य महाराज देगलूरकर

(लेखक वेदान्ताचे तसेच ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवद्गीता अशा श्रेष्ठ ग्रंथांचे अभ्यासक असून वारकरी पंथातील नामवंत कीर्तनकार आहेत.)