घराचे आपत्कालीन बजेट
कोव्हिड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे व्यवसाय जमीनदोस्त झाले, बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना पगार-कपात सोसावी लागली. प्रत्येकाचेच आर्थिक बजेट कोलमडले. परिणामी, सर्वांनाच ‘आपत्कालीन बजेट’- बचत करण्याच्या सवयीचे व आणीबाणीच्या परिस्थितीत वापरता येऊ शकेल असा ‘निधी’ उभारण्याचे महत्त्व पुन्हा एकदा समजून आले. हे महत्त्व अधोरेखित करण्यापूर्वी ‘घराचे आपत्कालीन बजेटिंग’ म्हणजे नक्की काय आणि ते कसे जमवून आणायचे हे पाहूया.
कुठलीही व्यक्ती स्वतःच्या भावी उत्पन्न-प्रवाहाविषयी खात्रीलायकरीत्या काहीही सांगू शकत नाही. अचानकपणे येणाऱ्या संकटामुळे नोकऱ्या, उद्योगधंदे बंद पडू शकतात किंवा कुणाला पगार-कपातीला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत खर्च कमी करण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही अत्यावश्यक खर्च (जसे की अन्नपाणी, घरभाडे, विजेचे बिल, मुलांचे शिक्षण, कर्जाचे व व्याजाचे हप्ते, नोकरीचा प्रवासखर्च, औषधपाणी इत्यादी.) करावेच लागतात. अशी आणीबाणीची वेळ निभावण्यासाठी जर एखाद्याने दूरदर्शीपणाने ‘राखीव-निधी’ जमवला असेल तर तो कामी येतो. प्रत्येकानेच परिस्थिती चांगली असताना आपत्ती काळात उपयोगी पडेल असा ‘राखीव-निधी’ निर्माण केला पाहिजे. कमीतकमी सात-आठ महिने पगार मिळाला नाही, तरीही तग धरता येईल अशी व्यवस्था करून ठेवली पाहिजे.
उपजीविकेसाठी एकाच प्रकारच्या शिक्षणावर, क्षेत्रावर वा कौशल्यावर अवलंबून राहणे शहाणपणाचे नसते. कारण परिस्थितीचा विपरीत फटका कुठल्या क्षेत्राला, सेवेला वा उद्योगाला कधी व कसा बसेल हे सांगता येत नाही. आताही अनेकांनी नोकरी गमावल्यानंतर स्वतःचे लघुउद्योग सुरू करून परिस्थितीला तोंड दिले. ज्या उद्योजकांचे शहरातील उद्योग बंद पडले, त्यांनी आपापल्या गावी परतून शेतीची तसेच इतर शारीरिक कष्टांची वा कौशल्यांची (शिंपीकाम, सुतारकाम, रंगाऱ्याचे काम इत्यादी) कामे करून पैसे कमावले. काहींनी सोने तारण ठेवून पैसे उचलले तर काहींनी पाळलेल्या बकऱ्या, कोंबड्या विकून पैसे उभे केले. थोडक्यात काय, तर आर्थिक वातावरण चांगले असताना, वेगळे शिक्षण / कौशल्ये अवगत केली असतील, तसेच ज्यावर पैसे कमावता येतील अशी ‘मत्ता’ (अॅसेट्स) निर्माण केली असेल, तर संकट काळात निश्चितपणे त्याचा फायदा होतो.
पुरेशी आवक नसल्यामुळे जे मध्यमवर्गीय लोक स्वतःसाठी योग्य प्रमाणात आर्थिक सुरक्षा निर्माण करू शकत नाहीत, त्यांनी जीवन तसेच आरोग्य विमा योजनांमध्ये पैसे गुंतवायला हवेत. ह्या गुंतवणुकीकडे निव्वळ ‘कठीण काळासाठीची सोय’ म्हणून बघितले पाहिजे. अधिकाधिक ‘परतावा’ (रिटर्न) मिळविण्यासाठी ही गुंतवणूक फायद्याची ठरत नाही.
आपत्तीच्या काळात, उत्पन्नाचे ओघ लक्षात घेऊन खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवले पाहिजे. आर्थिक भरभराटीच्या काळात अनेक अनावश्यक सवयी / गरजांचे आपण गुलाम बनत असतो. ज्या गरजा भागल्या नाहीत तरीही उत्तम, आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते त्या गरजांना कायमस्वरूपी फाटा देण्याची हीच उत्तम संधी असते.
ह्या काळात, अनेकांना घरून काम करण्याची मुभा मिळाली. त्यामुळे प्रवासखर्च वाचला. ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या सवलतींमुळे (डिस्काउंट, रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक इत्यादी) घरखर्च थोडा कमी झाला. अनावश्यक गरजांना कात्री लावल्यामुळे पैसे वाचले. अशा पद्धतीने वाचविलेल्या पैशांची बचत करावी. चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये ते गुंतवावे. गुंतवणुकीचे निर्णय व्यवस्थित अभ्यास करून, हितचिंतकांशी चर्चा करून घ्यावेत.वाचविलेल्या पैशांतील काही भाग औषधपाण्यासाठी राखून ठेवा.
ज्यांना आपत्ती काळामुळे कर्जाच्या मुद्दलाचे व व्याजाचे हप्ते भरणे कठीण होऊन बसले आहे, त्यांनी ज्या बँका वा वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे, त्यांच्याशी त्वरित संपर्क साधावा व आपल्या अडचणींविषयी मोकळेपणी बोलावे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सवलतींचा (कर्ज-परतफेड, व्याजाचे हप्ते पुढे ढकलण्याच्या सवलतींचा) आवश्यक तेवढाच फायदा घ्यावा. कारण आज नाही, तरी उद्या ते हप्ते भरावे लागतातच व एकत्रितपणे त्यांचे ओझे अधिकच असणार आहे. शिवाय कारणाशिवाय हप्ते भरण्यात दिरंगाई करणाऱ्यांची पत बँकांच्या नजरेतून कमी होत असते, हे कायम लक्षात ठेवा. ह्याचा विपरीत परिणाम भविष्यात कर्ज मिळण्यावर निश्चितपणे होऊ शकतो.
अडचणीच्या काळात शक्यतो कर्ज काढू नये. कारण उत्पन्नाची खात्री नसताना केलेल्या कर्ज-व्यवहारात फसवणुकीची शक्यता असते. चढ्या दराने व्याजाचा बोजा वाढू शकतो. त्यापेक्षा मत्ता विकून (उदा. सोने, घर वा शेअर्स इत्यादी) रोकड पैसे मिळविण्याचा पर्याय असेल तर तो वापरावा. दिवस पालटले, की पुन्हा मत्ता निर्माण करता येते. तसेच खर्चांवर ताबा राहण्यासाठी क्रेडिट कार्डाऐवजी डेबिट कार्ड वापरावे. त्यामुळे खर्च आपल्या मिळकतीच्या चौकटीबाहेर जात नाहीत.
थोडक्यात काय, तर नव्याने उत्पन्न-खर्चांचा ताळमेळ घालून, अत्यावश्यक गरजा व अनावश्यक सवयी ह्यांतील फरक ओळखून, बचतीस प्राधान्य देऊन, आणीबाणीच्या परिस्थितीत कामी येईल असा ‘राखीव निधी’ उभारून व कर्जाचा बोजा वाढणार नाही, याची काळजी घेऊन आपत्ती काळाकरिता उत्तम बजेट बनविता येते. कसोटीच्या काळात लावून घेतलेल्या चांगल्या आर्थिक सवयींचा आयुष्यभरासाठी फायदा होतो.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. रूपा रेगे-नित्सुरे
(लेखिका लार्सन अँड टूब्रो फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये समूह प्रमुख अर्थतज्ज्ञ आहेत)