दागिने हा बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आता हे कशापासून बनविलेले आहेत म्हणजे सोन्याचे, मोत्याचे, पोवळ्याचे, हिऱ्याचे की इतर मौल्यवान रत्नांचे आहेत, तसेच ते कुठल्या प्रकारचे आहेत, तो सोन्याचा घसघशीत हार आहे, नाजूक माळ आहे, मोत्यांचा पेशवेशाही दागिना आहे, आधुनिक प्रकारचा हार आहे, हिऱ्याचा नेकलेस, त्याचबरोबर कुडी की झुंबर की रंगीत रत्नांचे दागिने आहेत, ह्यावरून ते कुठल्या प्रसंगी वापरायचे ते आपण ठरवतो.
सर्वसाधारणपणे सोन्याचे दागिने घराघरांतून जास्त वापरले जातात, त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यायची हे माहीत असते. परंतु रत्नजडित अलंकार हे पूर्वीपासून कमी प्रचलित होते. अलीकडे त्याची लोकप्रियता वाढलेली दिसते. त्यामुळे त्याविषयी थोडी माहिती करून ते वापरताना त्यांची काळजी कशी घ्यायची ते आपण पाहणार आहोत.
सहसा असे मौल्यवान दागिने कोणत्याही विश्वसनीय पेढीतूनच घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही. रत्ने ही राशीनुसार नवग्रहांची उपरत्ने म्हणून वापरली जातात, माणिक – सूर्य, पोवळे – मंगल, पाचू – बुध, पुष्कराज – गुरु, हिरा – शुक्र, नीलम – शनि व मोती – चंद्र इत्यादी या ग्रहांसाठी वापरले जातात.
आता ह्या दागिन्यांची काळजी कशी घ्यायची ते पाहू.
कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांवर सौंदर्यप्रसाधनांचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ती वापरताना अंगावर नसतील याची काळजी घ्यावी. म्हणजेच मेकअप करताना, परफ्य़ूम लावताना, मॉईश्चरायझर लावताना पण काढून ठेवावेत.
मोत्यांचे दागिने – तन्मणी किंवा एकसरी प्रकार असल्यास ते वापरून झाल्यावर ओल्या कपड्याने पुसून कोरडे झाल्यावर जागेवर ठेवावेत. कर्णफुले, अंगठी हे प्रकार पाण्याने हलक्या हाताने धुवावेत.
हिऱ्यांचे दागिने- रोजच्या वापरातील कर्णफुले, अंगठ्या घरी स्वच्छ करणे शक्य आहे. एक ते दोन थेंब सौम्य साबण १/२ वाटी पाण्यात घालून ते उकळावेत, नंतर एखाद्या मऊ ब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवावेत. साबण शिल्लक राहणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी. शिवाय वर्षातून एकदा अशा रोजच्या वापरातील दागिने व त्याचे सेटिंग तपासून घ्यावे.
पोवळे हे मोत्याप्रमाणेच समुद्राजन्य रत्न आहे. ते वापरताना काही वेळा ते कोरडे पडून त्या रत्नांवरचे पोत पडू शकते. अशा वेळी त्याला थोडे तेलाचे बोट लावल्यास ते पूर्ववत दिसू शकते. ज्याप्रमाणे आपल्या त्वचेला स्निग्धतेची गरज असते तसेच पोवळयाचेही आहे.
कोणतेही दागिने हे त्याच्याबरोबर दिलेल्या योग्य अशा पेटीतच ठेवावेत. ते रंगीत कपड्यात किंवा रंगीत कागदात गुंडाळू नयेत, तसेच ते इतर दागिन्यांबरोबर एकत्र ठेवू नयेत.
तसे पाहिले तर सर्वच वेगवेगळ्या कप्प्यांतून ठेवावेत जेणेकरून ते एकमेकांवर घासून त्यांना नुकसान पोहोचणार नाही.
शेवटी पुन्हा एकदा महत्वाचे, सौंदर्यप्रसाधने तुमचे सौंदर्य वाढवीत असली तरी ती दागिन्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. तेव्हा सौंदर्यप्रसाधने आणि प्रदूषण ह्यापासून दागिन्यांचा बचाव केल्यास तुमचे दागिने सदैव चमकत राहतील !!!!…….
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्वाती लागू