सल्ल्यांचे हल्लेः स्वरूप व उपाय | ज्ञानेश्वर मुळे | Advice Attacks: Nature and Remedies | Dnyaneshwar Mulay

Published by ज्ञानेश्वर मुळे on   April 1, 2022 in   Readers Choiceमराठी लेखणी

सल्ल्यांचे(सल्ला) हल्लेः स्वरूप व उपाय

माणसाची काही प्रमुख लक्षणे आहेत. तो सामाजिक प्राणी आहे. त्याचा मेंदू प्रगल्भ आहे. त्याने संस्कृती आणि सभ्यता यांच्याबरोबरच विविध क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे. माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वश्रेष्ठ प्राणी ठरला. इतका की मनुष्य विश्व आणि प्राणीविश्व आपण वेगवेगळे मानायला सुरुवात केली. असो.., याबरोबरच ‘सल्ला’ नावाचे एक पिल्लूही जन्मले. प्राणीविश्वातले सगळे शिक्षण नैसर्गिक. त्यांच्या भावभावना, पुनरुत्पादन, समागम, मरण या सगळ्यांत निसर्गाला धरून देहधर्म हाच स्वभाव. म्हणूनच एखादी व्यक्ती ‘जंगली’ आहे असे आपण म्हणतो, तेव्हा ती व्यक्ती मनुष्यजगतापेक्षा वेगळी वागते असेच आपण म्हणत असतो. त्याला चांगले ‘संस्कार’, ‘शिक्षण’ किंवा ‘सल्ला’ मिळाला नाही असे आपण सूचित करत असतो.

यातील ‘सल्ला’ हा घटक ‘संस्कार’ व ‘शिक्षण’ यांपासून खूप वेगळा आहे. तो कुणीही कुणाला देऊ शकतो. आमच्या भागात एक जिल्हा पातळीवरील वृत्तपत्र होते, ते सातत्याने संयुक्त राष्ट्रसंघाला सल्ला देत असे. पॅलेस्टाइनमध्ये असे झाले पाहिजे, आपण क्युबाचे अनुकरण केले पाहिजे, रशिया-अमेरिकेला ठणकावून सांगितले पाहिजे वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या सल्ल्यांचे फार खोल परिणाम माझ्या ग्रामीण संस्कारक्षम मनावर व्हायचे.संपादकांविषयी कमालीचा आदर वाटायचा. ते सातत्याने आंतरराष्ट्रीय विषयांवर लिहितात, त्यामुळे मन अभिमानाने भरून यायचे. मायबोलीतील ते सल्ले संयुक्त राष्ट्रसंघाने आणि महासत्तांनी वेळोवेळी ऐकले असते, तर अफगाणिस्तानपासून व्हेनेझुएलापर्यंतचे आणि भारत-चीन सीमाप्रश्नापासून आफ्रिकेतील गरिबीपर्यंत सगळेच प्रश्न केव्हाच सुटले असते, असे माझ्या निरागस मनाला वाटायचे.

नंतरच्या काळात देशविदेशात संचार करताना लक्षात आले, की सल्ले महत्त्वाचे असतात. कारण ते फुकट देता किंवा घेता येतात. पंचमहाभूतांपैकी सगळीच ‘भूते’ (जमीन, पाणी, वीज, वायू व आकाश) विक्रीला उपलब्ध असताना सल्ल्यांचा महापूर मात्र फुकटात मिळतो. एकंदरीतच या देशात (व जगातही!) शिकल्यासवरल्या लोकांची संख्या वाढत चालली तसतसा सल्लागारांचा सुळसुळाट होऊ लागला. गरिबी कशी घालवावी हा सल्ला देत स्वतःच्या गरिबीवर मात करणारे सल्लागार वेगवेगळ्या पातळीवर काम करतात. अशा या सल्ल्यातून कोणताच बोध होत नाही. झालाच तर गोंधळ उडतो आणि मग सुरेश भटांच्या ओळी कानात गुंजारव करतात- ‘एक माझा प्रश्न त्याला फारच येती उत्तरे। हे खरे की ते खरे की ते खरे?’ आज सुरेश भट असते तर सल्ल्यांचे हल्ले पाहून म्हणाले असते, ‘लाख माझे प्रश्न त्याला अब्ज येती उत्तरे। हे खरे की ते खरे की ही खऱ्याची लक्तरे?’ असो…

सल्ला देण्याघेण्याचा रोग मनुष्यजातीला काही नवा नाही. गंमत म्हणजे या सल्ल्यांमध्येही टोकाचे विरोधी सल्ले पाहायला मिळतात. उदा. भविष्याची चिंता करू नये असे म्हटले तरी, ‘यद् भविष्यो विनश्यति’ (जे होईल ते पाहू म्हणणारे नष्ट होतात), ‘अति सर्वत्र वर्जयेत्’ याच्या विरुद्ध ‘ऋणं कृत्वा घृतम् पीबेत्’ हा चार्वाकाचा संदेश बहुतेक लोक आचरणात आणताना दिसतात.

संवाद आणि सल्ला यांचे पुरातन नाते आहे. उपनिषद असो किंवा प्रवचन, कीर्तन, भाषणे असोत किंवा चर्चा; त्यांचा अंतिम रोख योग्य निर्णय प्रक्रियेकडेच असतो. मानवी उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सल्लामसलत. त्यातूनच खलबत, किचन कॅबिनेट, आपले वर्तुळ, जवळचा माणूस, अष्टप्रधान मंडळ, नवरत्न दरबार, मंत्रिमंडळ, थिंक टँक, लॉबिंग ग्रुप, प्रचार-प्रसार इत्यादी संकल्पना व व्यवहार तयार झाले. आज संयुक्त राष्ट्रसंघापासून ते गावातल्या ग्रामपंचायतीपर्यंत वेगवेगळ्या पद-नामांसह सल्लागारांची स्थापना करण्यात आली आहे. सल्ल्याची प्रत्येकाला गरज असते. कुरुक्षेत्रावर गलितगात्र होऊन युद्ध नकोच म्हणणाऱ्या ‘शांतिप्रिय’ अर्जुनाला ‘जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील व हरलास तर स्वर्गप्राप्ती मिळवशील’ असा ‘मरो वा मारो’चा सल्ला कृष्णाने दिला आणि त्या आधारावर अर्जुनाने आपले भाऊ, जवळचे नातेवाईक इतकेच काय, गुरुवर्यांविरुद्ध अटीतटीचे युद्ध केले.सल्ला आणि त्याचे परिणाम यांच्यात नेहमी मेळ असतोच असे नाही आणि परिणाम दिसेपर्यंत अनेकदा सल्लागार आपली फी घेऊन गायब झालेला असतो. युद्ध असो वा व्यवसाय; हीच गोष्ट जागोजागी दिसते.

सामाजिक माध्यमांनी सल्ला संस्कृतीला एका नव्या अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवले आहे. पर्यावरण, संवर्धन, तणावमुक्ती, व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, शेती… विषय कोणताही असो; ‘घरोघर सल्लागार’ अशी सोय सामाजिक माध्यमांनी केली आहे आणि हा प्रत्येक सल्ला अमलात आणायचे ठरवले तर वेड लागल्याशिवाय राहणार नाही. सध्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास कोविडच्या बाबतीत कोणती औषधे घ्यायची याचे सल्ले अनेकांनी दिले, इतके की या सल्ल्यांचे हल्ले अनेकांसाठी प्राणघातक ठरले. पण आपले कोविडविषयक ज्ञान अपूर्ण आहे, अपरिपूर्ण आहे हा सावधगिरीचा इशारा मात्र कुणीच दिलेला दिसत नाही.

मला आठवते जेव्हा मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो तेव्हा आमच्या गावच्या सरपंचांनी ‘छान, आता तुला सहज मेडिकलला प्रवेश मिळेल. सायन्सला प्रवेश घे, डॉक्टर होशील,’ असा सल्ला दिला. अर्थातच प्रेमापोटी. दुसऱ्या एका हितचिंतक प्राध्यापकांनी कॉमर्सला जाऊन सीए व्हायचा सल्ला दिला, तोही प्रेमापोटीच. आई म्हणाली, ‘गावातच काहीतरी कर, दूर जाऊ नकोस.’ तेसुद्धा मायेपोटीच. मी सर्वांनाच ‘हो’ म्हटले आणि कला शाखेला प्रवेश घेतला. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा यात मला रुची होती आणि मला आय.ए.एस. बनून कठीण, अप्राप्य, दूरचे असे काहीतरी साध्य करायचे होते. त्यावेळेस मी सर्वांची निराशा केली. पण त्यानंतर चार-पाच वर्षांनी मी जेव्हा पुण्याला डेप्युटी कलेक्टर आणि नंतर विदेश सेवेत जपानला दूतावासात अधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा सर्वांनी माझा सत्कार केला.

सगळे सल्ले कामनिरपेक्ष नसतात. माझ्याकडे स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी येणाऱ्यांना मी कालोचित सल्ला देतो. मुख्य म्हणजे या स्पर्धा परीक्षा मी ३८ वर्षांपूर्वी दिल्याने त्या विषयावरचा माझा सल्ला कालबाह्य झाल्याचे सांगतो. शिवाय, हेही सांगतो की आय.ए.एस.च्या पलीकडे करिअर व जीवनाचे उत्तमोत्तम पर्याय आहेत. तेव्हा प्रत्येकाने या मृगजळाच्या मागे जाणे प्रशस्त तर नाहीच, पण ते धोकादायकही आहे. अर्थातच, माझा सल्ला न मानणारेच अधिक असावेत. लहानपणी परीकथेतील राजपुत्राला ‘तू दक्षिणेकडे जाऊ नकोस’ असे सांगितले गेले, की तो दक्षिणेलाच मुद्दामहून जात असे. तसेच हे ‘राजपुत्र’ आहेत. अडचणीचे डोंगर, नद्या, दऱ्या ओलांडून त्या राक्षसाच्या राजवाड्यात जाऊन राजकन्येची सुटका करू पाहणारे राजकुमार.एकीकडे सल्ला न मागता देणाऱ्यांची संख्या अतोनात वाढली आहे, तर दुसरीकडे योग्य सल्ला न मानणाऱ्यांची संख्यासुद्धा!

आजच्या अत्यंत जटिल अशा काळात सल्लागार, कन्सल्टंट, समुपदेशक या सर्वांची संख्या वाढतच जाणार आहे. अशा वेळी मार्गदर्शक अशी काही तत्त्वे आणि काळजी आपण घेऊ शकतो का ते बघूया :

१) आपली समस्या आणि प्रश्न नेमका काय आहे हे खोलात जाऊन पाहिले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असे होऊ नये. प्रश्न योग्य असेल तर उत्तर योग्य मिळण्याची शक्यता असते.

२) आपल्या समस्येची चर्चा जवळच्या विश्वासू माणसाबरोबर किंवा कुटुंबीयांबरोबर करावी. कदाचित तेच नेमका उपाय सुचवू शकतील. मग सल्ला विकत घेण्याची गरज भासणार नाही.

३) सल्ला देण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी पब्लिक डोमेनवर उपलब्ध माहिती वाचायला विसरू नका. कधी नव्हे इतका ज्ञानाचा खजिना आज इंटरनेट व अन्य माध्यमांतून एका ‘टच’वर उपलब्ध आहे.

४) वेळ वाचेल म्हणून इतरांचा सल्ला मागायचे टाळा. अनेकदा ‘स्वाध्याय’ आणि ‘जावे त्याच्या वंशा’ उपयोगी पडते. काही बाबतीत स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही,  कितीही पैसा खर्च केला तरी.

५) डेल कार्नेगीने ‘मित्र कसे जिंकावेत व प्रभाव कसा टाकावा?’ हे पुस्तक लिहिल्यापासून ‘करोडपती कसे व्हावे?’, ‘यशस्वी कसे व्हावे?’, ‘व्यापार कसा वाढवावा?’, ‘उत्तम वक्ता कसा व्हायचे?’ वगैरे सेल्फ हेल्प सल्लागार पुस्तकांची बाजारात रेलचेल झाली आहे. अशा सल्ल्यांमुळे फक्त पुस्तक लिहिणारे श्रीमंत होतात,  वाचणारे नव्हे हे लक्षात ठेवा. जीवनात स्वतःचा मार्ग स्वतःलाच शोधावा लागेल.

६) सल्ला देणाऱ्यांची पाश्र्वभूमी तपासून पाहा किंवा त्यांच्या ज्ञानाविषयीची खात्री झाल्यानंतरच सल्ला विचारा.

७) महत्त्वाच्या विषयांवरचा सल्ला मिळाल्यानंतर तो तपासून पाहावा.

८) सल्ला नाकारायला किंवा अतिरिक्त प्रश्न विचारायला संकोच करू नये. असा संकोच आजारपण किंवा महत्त्वाच्या आर्थिक बाबतीत असेल, तर धोकादायक ठरू शकतो.

सल्ल्यांच्या हल्ल्यांना परतवायचे असेल, तर त्यासाठी सगळ्यांत जुना मंत्र ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ आजही तितकाच लागू पडतो.

आजच्या काळात सल्ला ही अपरिहार्य गोष्ट झाली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत वडीलधाऱ्यांचा अभाव, सर्वत्र पसरलेली पैशाची हाव, स्पर्धा आणि त्याच्या तीव्रतेतून येणारा ताण, बेकारी आणि गरिबी यामुळे येणारे नैराश्य. इतकेच काय, करिअरच्या अमर्याद वाटासुद्धा व्यक्तीला सल्ला घ्यायला भाग पाडतात. पण आपण ध्यानात ठेवूया, की आयुष्य म्हणजे समस्या नव्हे, तर आयुष्य म्हणजे एक रहस्य आहे. जगताना आपण ते रहस्य उलगडण्याचा आनंद घ्यायला हवा आणि सल्ला विचारायचाच असेल, तर तुमच्या अंतर्मनाचे कवाड उघडायला हवे. तिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमचीच वाट पाहताहेत. जा, त्यांना कडकडून भेटा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्ञानेश्वर मुळे

(लेखक निवृत्त सनदी अधिकारी आहेत.)