नररत्न लाला लजपतराय व स्वातंत्र्यलढा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 27, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

भारताच्या स्वातंत्र्यलढयात लाल, बाल, पाल ही त्रिमूर्ती बरीच गाजली. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपीनचंद्र पाल. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेस पक्षात जहाल आणि मवाळ असे दोन पक्ष होते. ही त्रिमूर्ती जहाल पक्षाची अग्रणी म्हणून ओळखली जाई. लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी झाला. लालाजींच्या वडिलांचे नाव राधाकिसन होते. लालाजींचे आजोबा जैन धर्मानुयायी होते आणि आई शीख पंथानुसार वागणारी होती. लालाजींचे वडील राधाकिसन हे मुसलमान संस्कृतीत वाढले. त्यांनी बालपणी उर्दू आणि फारसी या भाषांचा निष्ठेने अभ्यास केला. त्यांच्यावर मुसलमानी धर्माचा एवढा प्रभाव पडला की, ते रोज नमाज पढत, रोजे पाळीत. त्यांच्या मनात आपण इस्लाम धर्म स्वीकारावा असेही फार होते. पण त्यांची पत्नी – म्हणजे लाला लजपतराय यांची मातोश्री – ही कडवी धर्माभिमानी होती. त्यामुळे राधाकिसन धर्मांतर करु शकले नाहीत.

लालाजींचा आणि लोकमान्य टिळकांचा स्नेह


लाला लजपतराय हे पेशाने वकील होते. त्यांनी वकिलीत उदंड पैसा कमावला आणि तो सामाजिक कार्यासाठी मुक्त हस्ताने खर्च केला. लालाजींचे वागणे सडेतोड, वृत्ती स्वाभीमानी आणि निर्भय असे. भीती ही गोष्ट त्यांना ठाऊक नव्हती. इतर पुढाऱ्यांप्रमाणे स्वतः मागे राहून अनुयायांना लढायला पाठविणे त्यांना मान्य नव्हते. लालाजींचा आणि लोकमान्य टिळकांचा स्नेह होता. लालाजी अमेरिकेत असताना तेथील भारतीयांना आपल्या देशबांधवांची पारतंत्र्यातील दुःस्थिती समजावी आणि त्या लोकांत राजकीय जागृती व्हावी, म्हणून ते अहोरात्र झटत होते. जवळ पैसा नसल्यामुळे त्यांचे खूप हाल होत. लोकमान्यांना हे वृत्त कळताच त्या काळात लोकमान्यांनी १५ हजार रुपये लालाजींना पाठविले. त्या वेळी लालाजींनी काढलेले टिळकांसंबंधीचे गौरवोद्गार प्रसिद्ध आहेत. ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी विदेशात चाललेल्या चळवळीचे महत्त्व जाणणारा एकच एक महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळक होत’, असे लालाजी म्हणाले होते. अमेरिकेतील हिंदी बांधवांमध्ये लोकजागृतीचे काम करुन लालाजी बोटीने हिंदुस्थानात आले आणि मुंबई बंदरात उतरले. २० फेब्रुवारी १९२० रोजी मुंबईत लालाजींचा भावपूर्ण सत्कार झाला. त्या वेळी लालाजींना जे मानपत्र अर्पण केले गेले त्याखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि रावबहादूर चिंतामण विनायक वैद्य या महाराष्ट्राला ललामभूत झालेल्या दोन नरश्रेष्ठांच्या सह्या होत्या.

लालाजींचे राष्ट्रकार्य


लाला लजपतराय यांनी पंजाबी भाषेत त्या काळात शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले होते. ‘पंजाब केसरी’ म्हणून सन्मानित झालेल्या लालाजींचा महाराष्ट्राशी किती घनिष्ट स्नेहबंध होता हे यावरुन समजून येईल. अस्पृश्यतेच्या विरुद्ध लालाजींनी फार मोठे काम केले. ते स्वातंत्र्यलढयाचे सेनानी तर होतेच, तसेच आर्य समाजाचे नेतेही होते. काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते. हा इतका मोठा माणूस मनाने महाराष्ट्राच्या जवळ होता.

दुर्दैवी मृत्यू


१७ नोव्हेंबर १९२८ रोजी इंग्रज सरकारविरुद्ध निघालेल्या एका शांततापूर्ण मोर्चावर पोलिसांनी पाशवी लाठीहल्ला केला लालाजींवरच हल्ला करावयाचा असे ठरवून त्यांच्यावर निर्दय लाठीमार केला गेला. त्या वेळी लालाजींच्या अनेक अनुयायांनी आपल्या प्राणांची बाजी लावून त्या क्षणापुरते तरी त्यांना वाचविले, पण या हल्ल्यात जबर जखमी झालेले लालाजी वाचू शकले नाहीत. त्यांच्या निधनाची वार्ता कळली तेव्हा उभा महाराष्ट्र हळहळला आणि ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा संतापाची आवेशपूर्ण लाट उसळली.

     लालाजींसारख्या नररत्नाचे स्मरण करणे हे सांप्रतचे एक धर्मकार्यच आहे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये व्दारी पुस्तकामधून